पतीचा मृत्यू; पत्नी-मुलगी अतिदक्षता विभागात, पोलिसांकडून तपास सुरू
पिंपरी, दि. ०२ प्रतिनिधी : युनूस खतीब ,
आर्थिक अडचणींमुळे मोरवाडी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेत विनोद पिल्ले (वय ५०) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या पत्नी सिरजा पिल्ले (वय ४५) आणि मुलगी पूर्णिमा पिल्ले (वय १९) यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघींवर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पिल्ले कुटुंब मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये राहत होते. सिरजा या शाळेत कामावर न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईक घरी पोहोचले असता तिघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांना वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र विनोद यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या पाहणीत घटनास्थळी एक चिठ्ठी, रासायनिक पदार्थाची बाटली तसेच जळालेला कोळसा आढळून आला. चिठ्ठीत आर्थिक विवंचनेचा उल्लेख असून या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा मजकूर असल्याची प्राथमिक माहिती आहे. कुटुंबीयांचे मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातील डिजिटल माहितीची तपासणी केली जात आहे.
विनोद हे उच्चशिक्षित होते, तर पूर्णिमा संगणकशास्त्राचे शिक्षण घेत होती. सिरजा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाने काही वर्षांपूर्वी नेहरूनगरमधील स्वतःचे घर विकून मोरवाडी येथे भाड्याने वास्तव्य सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमागील नेमकी आर्थिक परिस्थिती तसेच अन्य कारणांचा संत तुकाराम नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.



