शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ उन्नती सोशल फाउंडेशन येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत उपस्थितांनी पीडित चिमुकलीला न्याय मिळावा, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी आणि अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी केली.
निषेध सभेची सुरुवात पीडित चिमुकलीप्रती संवेदना व्यक्त करत दोन मिनिटे मौन पाळून करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिक, महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि उन्नती सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी हातात निषेध फलक घेऊन महिलांवरील व बालिकांवरील अत्याचाराविरोधात एकजुटीने आवाज उठविला. “चिमुकल्यांचे बालपण सुरक्षित ठेवणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे”, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “वाकड येथे घडलेली घटना ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण समाजाच्या विवेकाला हादरा देणारी आहे. अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना समाजात स्थान नाही. अशा आरोपींना कायद्याच्या चौकटीत राहून कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसेल. प्रत्येक मुलगी निर्भयपणे जगू शकेल, असे सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही शासन, प्रशासन आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ एखाद्या घटनेपुरता मर्यादित न ठेवता त्याकडे सामाजिक चळवळ म्हणून पाहण्याची गरज आहे. पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधावा, शाळा, सामाजिक संस्था आणि नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद घटनांची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे.”
निषेध सभेत उपस्थितांनी शासन आणि पोलीस प्रशासनाकडे या प्रकरणाचा जलदगतीने तपास पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती मोहीम, संवेदनशील परिसरांमध्ये पोलीस गस्त वाढविणे, सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करणे आणि नागरिकांच्या सहभागातून सुरक्षित समाज उभारण्यावर भर देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
सभेच्या शेवटी उपस्थितांनी एकमुखाने “अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया, चिमुकल्यांच्या सुरक्षिततेसाठी एकजुटीने उभे राहूया” असा निर्धार व्यक्त केला. समाजातील प्रत्येक मुलगी सुरक्षित, सन्मानाने आणि निर्भय वातावरणात वाढावी, यासाठी प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून पुढे यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.



