spot_img
spot_img
spot_img
spot_img

कागदपत्रांच्या त्रासाला पूर्णविराम ; नागरिकांसाठी भव्य समाधान शिबिर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही अनेकदा सामान्य नागरिकांची कामे महिनोनमहिने प्रलंबित राहतात. दाखले, प्रमाणपत्रे, मतदार यादीतील दुरुस्ती, आधार, रेशन कार्ड, पेन्शन, आयुष्मान भारत कार्ड अशा असंख्य कामांसाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. या पार्श्वभूमीवर लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त “छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे समाधान शिबिर” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत खंडोबा मंदिर सभागृह, खंडोबा माळ, आकुर्डी, पिंपरी-चिंचवड येथे हे शिबिर होणार असून नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या शिबिरात उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमी लेयर, ज्येष्ठ नागरिक, आधार दुरुस्ती, मतदान यादीतील नाव समाविष्ट करणे किंवा दुरुस्ती, ऑनलाइन सातबारा, फेरफार उतारा, रेशन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी व श्रावणबाळ योजनांसह अनेक महसुली आणि सामाजिक योजनांशी संबंधित सेवा उपलब्ध असणार आहेत. तसेच महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, दिव्यांगांसाठी आणि विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया याच ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेशी संबंधित पात्र लाभार्थींनाही आवश्यक कागदपत्रांसह मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

शिबिरात सहकार विभागाशी संबंधित हाऊसिंग सोसायट्यांचे प्रश्न, महावितरणच्या तक्रारी, तसेच विविध शासकीय योजनांबाबत तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. विधवा महिला, अत्याचारित परित्यक्ता महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला व बालकल्याण योजनांचे लाभार्थी यांच्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादीही जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी ती सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या समाधान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि तज्ज्ञ एकाच ठिकाणी उपस्थित राहणार असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या वाचणार आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून नागरिकांच्या दारात सेवा पोहोचविण्याचा हा प्रयत्न असून, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!