पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
सायबर फसवणुकीसाठी स्वतःचे बँक खाते उपलब्ध करून देत आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या खात्यामार्फत देशातील दोन नागरिकांची तब्बल १८ लाख ६३ हजार ६६७ रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनु रामधनी वर्मा (रा. ताथवडे, पुणे) याने फेडरल बँकेत खाते उघडून साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी त्याचा वापर केल्याचे समोर आले. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६१(२), ३१८(४), ३१७(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.



