प्रतिनिधी | युनूस खतीब
गहुंजे (ता. मावळ) येथे कारवाई करत शिरगाव पोलिसांनी गांजा बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून ₹२३,३१४ किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी अरबाज बशिर शेख (वय २८, रा. विठ्ठल मंदिराजवळ, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तर सलमान बशिर शेख (रा. गहुंजे) हा या गुन्ह्यातील फरार आरोपी आहे.
पोलीस हवालदार सचिन बबनराव काचोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क) व २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गहुंजे गावातील विठ्ठल मंदिरामागे कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी अरबाज शेख याच्या ताब्यातून ₹१८,३१४ किमतीचा हिरवट-तपकिरी रंगाचा ओलसर गांजा (कॅनाबिस वनस्पतीची पाने, फुले, बिया व बोडे) तसेच ₹५,००० किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल असा एकूण ₹२३,३१४ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान जप्त केलेला गांजा सलमान बशिर शेख याने आणून दिल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे करीत आहेत.



