प्रतिनिधी | युनूस खतीब
तडीपार असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात वावरत बेकायदेशीरपणे कोयता बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी अक्षय दशरथ शिंदे (वय २३, रा. जगताप पेट्रोल पंपाशेजारी, वैद वस्ती, पिंपळे गुरव, पुणे) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार शैलेश गुलाब मगर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.४० वाजता जुनी सांगवी येथील वसंतदादा पुतळ्यासमोरील गणपती विसर्जन घाटाच्या रस्त्यावर आरोपी संशयास्पदरीत्या आढळला.
तपासणीदरम्यान त्याच्याकडे लोखंडी कोयता विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगलेला आढळून आला. आरोपीला यापूर्वी १ जुलै २०२५ ते १ जुलै २०२७ या कालावधीसाठी पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. तसेच २२ जुलै ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचाही त्याने भंग केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ आणि १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस फौजदार निशांत काळे करीत आहेत.



