spot_img
spot_img
spot_img
spot_img

मूलभूत सुविधांअभावी प्रभाग क्र. १ त्रस्त; तातडीच्या विकासकामांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मधील मोरे वस्ती, चिखली, ताम्हाणे वस्ती आणि म्हेत्रे वस्ती परिसरातील मूलभूत नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १ हा महापालिकेला सर्वाधिक कर महसूल मिळवून देणाऱ्या प्रभागांपैकी एक असूनही येथील नागरिक अनेक वर्षांपासून रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि सार्वजनिक सुविधांपासून वंचित आहेत. नियमित कर भरूनही विकासकामांमध्ये सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

प्रभागातील अनेक अंतर्गत रस्ते अपूर्ण व खराब अवस्थेत असून, सक्षम ड्रेनेज व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात पाणी साचून अस्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत आहेत. तसेच नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे.

याशिवाय परिसरात महापालिकेचे रुग्णालय किंवा आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना उपचारांसाठी दूर जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शाळांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, मुलांसाठी खेळाचे मैदान आणि नागरिकांसाठी सार्वजनिक उद्यानाचीही कमतरता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विकास आराखड्यातील अनेक आरक्षणांच्या जागांचा मोबदला देण्यात आला असतानाही महापालिकेने त्या जागांचा ताबा घेतलेला नसल्याने नियोजित सार्वजनिक सुविधा अद्याप उभारल्या गेल्या नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

स्वराज्य पक्षाने महापालिकेकडे सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व बांधकाम, आधुनिक ड्रेनेज व्यवस्था, नियमित पाणीपुरवठा, महापालिका रुग्णालय, नवीन शाळा, खेळाची मैदाने, सार्वजनिक उद्याने, आरक्षणाच्या जागांचा ताबा घेऊन त्यावर सुविधा उभारणे तसेच प्रभाग क्रमांक १ साठी स्वतंत्र विशेष विकास आराखडा तयार करून निश्चित कालमर्यादेत त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

महापालिका प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अन्यथा प्रभागातील नागरिकांसह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे यांनी दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!