शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ११ मधील कृष्णानगर स्पाईन रोड परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून महापालिकेने तातडीने खड्ड्यांची डागडूजी करावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या वर्षीही याच स्पाईन रोडवरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मारुती जाधव मित्रपरिवार यांच्या वतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नसून यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा संपूर्ण परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात सुमारे ५६० खड्डे असल्याचा दावा केला असून गेल्या वर्षभरात खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी ₹150 कोटी खर्च केल्याचे सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था पाहता हा निधी नेमका कुठे खर्च झाला, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, येत्या आठ दिवसांत कृष्णानगर स्पाईन रोडवरील खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास खड्ड्यांचे “भावपूर्ण श्रद्धांजली” आंदोलन मोठ्या प्रमाणावर छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला असून महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.



