फुगेवाडी येथील महामेट्रो कार्यालयात सोमवारी, २७ जुलै २०२६ रोजी, प्रस्तावित निगडी ते चाकण मेट्रो मार्गाच्या सुधारित सविस्तर प्रकल्प अहवालाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रस्तावित मार्गाचे संरेखन, स्थानके आणि प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेची माहिती दिली. बैठकीला पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर UMTCचे सल्लागार रजनीश पोडवळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आमदार शंकर जगताप यांनी सांगितले, महामेट्रोने सुधारित डीपीआर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर केला होता. आता या अहवालाचे पदाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण झाल्याने प्रकल्पाच्या पुढील मंजुरी प्रक्रियेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. उपलब्ध प्रकाशित माहितीनुसार हा संपूर्ण मार्ग ४७.२१५ किलोमीटर लांबीचा, पूर्णपणे उन्नत स्वरूपाचा आणि ३४ स्थानकांचा प्रस्तावित आहे. प्रकल्पासाठी सुमारे १२ हजार ९३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आमदार शंकर जगताप यांनी राज्य शासन, महामेट्रो आणि महापालिका प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाच्या प्रशासकीय प्रक्रियेला गती मिळत असून, सुधारित डीपीआरच्या सादरीकरणामुळे प्रकल्पाला आवश्यक मंजुरी मिळण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे
विधिमंडळात शंकर जगताप यांनी उठवला होता आवाज
पिंपरी-चिंचवडमधील वाढते नागरीकरण, आयटी क्षेत्र, औद्योगिक आस्थापना आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे, अशी भूमिका आमदार शंकर जगताप यांनी सातत्याने मांडली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये विधिमंडळातील पुरवणी मागण्यांद्वारे त्यांनी निगडी ते चाकण व्हाया वाकड मेट्रो मार्गाच्या प्रलंबित सुधारित डीपीआरचा मुद्दा उपस्थित केला होता. डीपीआरला तातडीने मंजुरी देऊन प्रकल्प पुढे न्यावा आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान व सक्षम करावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली होती.दरम्यान नगरविकास विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील १९ जून २०२६ रोजी पत्राद्वारे सुधारित डीपीआरमध्ये आपण सुचविलेल्या मागण्यांचा समावेश करत असल्याचे सांगतिले होते.
भक्ती-शक्ती, ट्रान्सपोर्ट नगर, गणेश नगर, आदर्श नगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशाल नगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकाराम नगर, वल्लभ नगर, गवळी माथा चौक, सेंच्युरी एन्का कॉर्नर, लांडेवाडी, भोसरी गाव, भोसरी सेक्टर-१, गोडाऊन चौक, PIECC, भारत माता मोशी, चिंबळी फाटा, बारगे वस्ती, कुरुळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी आणि चाकण.
निगडी ते चाकण प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार. वाकड, नाशिक फाटा, भोसरी, मोशी आणि चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार. चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांना सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दैनंदिन प्रवाशांना सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाची सुविधा मिळणार. पिंपरी-चिंचवडमधील वेगाने विकसित होणाऱ्या परिसरांना थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार.खासगी वाहनांचा वापर, इंधनाचा खर्च आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार. मार्गालगतच्या निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक परिसरांच्या विकासाला चालना मिळणार.
— शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ


