spot_img
spot_img
spot_img

‘महाराजस्व शिबिरा’तून शिवरायांच्या विचारांची प्रत्यक्षात अंमलबजावणी – आमदार शंकर जगताप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 “छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. प्रशासन हे केवळ कार्यालयात बसून चालणारे नसावे, तर ते सर्वसामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचले पाहिजे, हीच शिवरायांची शिकवण आहे. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये’ या सूत्राप्रमाणे स्वराज्यातील शेवटच्या घटकाचे हित जपणे हेच आपले मुख्य कर्तव्य असून, याच विचारांतून नागरिकांना सन्मानाने त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे,” असे प्रतिपादन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी बुधवारी केले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून चिंचवड मतदारसंघातील आहेर मंगल कार्यालय येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली विविध शासकीय सेवा, दाखले आणि पेन्शन योजनांचे लाभ ३,२२५ गरजूंना थेट वितरीत करण्यात आले.महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, उपविभागीय अधिकारी (हवेली) डॉ. यशवंत माने, अपर तहसीलदार डॉ. जयराज देशमुख, नायब तहसीलदार डॉ. मनीषा माने-लोंढे, मुळशीचे तहसीलदार विनयकुमार चौबे, अन्नपुरवठा अधिकारी विजयकुमार क्षीरसागर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, माजी महापौर तथा नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, नगरसेविका आशाताई सूर्यवंशी, पल्लवीताई वाल्हेकर, मनीषाताई पवार, मनीषाताई चिंचवडे, कोमलताई काळे, सरचिटणीस  मधुकर बच्चे, तसेच बिभीषण चौधरी, काळूराम बारणे, सिद्धेश्वर बारणे, तानाजी बारणे, सचिन चिंचवडे, सुधीर वाल्हेकर, गोपाळ माळेकर, आदिती निकम यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरादरम्यान बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, “भारतीय जनता पार्टीचा मूळ विचार ‘अंत्योदय’ हाच आहे. समाजातील शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या घटकाचा विकास हाच खरा विकास मानून आम्ही ‘आमदार आपल्या दारी’ व ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून थेट नागरिकांपर्यंत पोहोचत आहोत. आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून एकाच छताखाली १५ पेक्षा जास्त महसुली व नागरी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. ७/१२ दुरुस्ती, फेरफार नोंदी, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून  लाभार्थ्यांना थेट मदत मिळवून दिली आहे. याशिवाय तुकडेबंदी कायदा व पट्टावाटपाच्या निर्णयांमुळे पिंपरी-चिंचवड आणि प्राधिकरणातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.”

विद्यार्थी, महिला व ज्येष्ठांसाठी विशेष सोयी

या शिबिरात अपंग, विधवा महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘श्रावण बाळ योजना’ आणि वैद्यकीय उपचारांसाठी ५ लाखांपर्यंतचे ‘आयुष्यमान भारत कार्ड’ तत्काळ काढून देण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच तरुण विद्यार्थ्यांची धावपळ थांबवण्यासाठी डोमिसाईल, राष्ट्रीयत्व, उत्पन्नाचे दाखले, तलाठी दाखले व मंडल अधिकारी अहवाल एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र महसूल कार्यालयाची मागणी

पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने होणारा विस्तार पाहता नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी पुण्याची किंवा दूरच्या कार्यालयांची वारी करावी लागू नये, यासाठी स्वतंत्र महसूल व्यवस्था उभारणीचा पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले. मुळशी व हवेली तालुक्यांत विखुरलेली कार्यालये चिंचवडमध्येच आणून तहसील कार्यालय, संजय गांधी निराधार योजना कार्यालय, कृषी कार्यालय व अन्नपुरवठा कार्यालय प्रत्येक विधानसभानिहाय स्वतंत्र व्हावे, अशी ठाम मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 आजच्या शिबिरातील योजना व लाभार्थी संख्या:

आयुष्यमान भारत कार्ड: ७७२
आभा योजना कार्ड: ४९२
S.I.R.: ४३०
रेशनकार्ड सही अर्ज:२७३
तलाठी उत्पन्न दाखले: २०८
संजय गांधी निराधार योजना (मंजुरी व पेन्शन): २०८
शालेय उत्पन्न दाखले:१९२
नवीन रेशनकार्ड वाटप: ११५
नोंदणी व मुद्रांक विभाग सेवा: १०७
आवास योजना लाभ: ७७
ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र: ७५
नॉन-क्रिमिनल प्रमाणपत्र:६१
डोमिसाईल दाखले: ४९
संजय गांधी नवीन मंजुरी पत्र वाटप:४५
रक्तदान शिबीर सहभाग:४२
जातीचे दाखले:३२
आधार कार्ड दुरुस्ती/सेवा:२५
नवीन मंजुरीसाठी संजय गांधी अर्ज:२२
(एकूण लाभार्थी: ३,२२५)

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!