लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १६ मधील विकासनगर, किवळे येथील सर्व्हे क्रमांक ३९, के-टाउन शेजारील आरक्षित मोकळ्या जागेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त सार्वजनिक उद्यान विकसित करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विकासनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्यास असून, लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरणे, व्यायाम आणि विरंगुळ्यासाठी सार्वजनिक उद्यानाची सुविधा उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून अनेक दिवसांपासून सार्वजनिक उद्यानाची मागणी होत असल्याचे ऐश्वर्या तर यांनी सांगितले.
प्रस्तावित उद्यानामध्ये आधुनिक खेळणी, वॉकिंग ट्रॅक, बसण्याची व्यवस्था, वृक्षारोपण, हिरवळ, आकर्षक सुशोभीकरण, एलईडी प्रकाशयोजना, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, संरक्षक कुंपण, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच नियमित देखभाल यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्यवृद्धी, पर्यावरण संवर्धन आणि परिसराच्या सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने या आरक्षित जागेची तातडीने पाहणी करून आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मान्यता देत सार्वजनिक उद्यान विकसित करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती नगरसेविका ऐश्वर्या तर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, विकासनगर परिसरात सार्वजनिक उद्यानाची उभारणी झाल्यास लहान मुलांना सुरक्षित खेळाचे मैदान, युवकांना व्यायामाची सुविधा आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनीही या मागणीचे स्वागत केले आहे.


