राष्ट्रवादीचे विशाल काळभोर यांची मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढीपर्यंत पोहोचावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये त्यांच्या प्रतिमा लावण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विशाल काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
काळभोर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्व. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या निर्णयक्षम नेतृत्वामुळे प्रशासनावर प्रभावी पकड निर्माण झाली होती. तत्पर कार्यशैली, लोकसंग्रह, विकासाभिमुख दृष्टीकोन तसेच शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राविषयी असलेली विशेष आस्था यामुळे ते जनतेचे लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि त्यांच्यामध्ये समाजसेवा, नेतृत्वगुण व विकासाची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमा लावण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या मागणीचा सकारात्मक विचार करून महापालिका प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही विशाल काळभोर यांनी व्यक्त केली आहे.



