२२ ते २८ जुलैदरम्यान शहरव्यापी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्याचे आयुक्तांना निवेदन; प्रत्येक प्रभागात नालेसफाई, कचरा उचल व औषध फवारणीवर भर
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शहरात २२ जुलै ते २८ जुलै २०२६ या कालावधीत “स्वच्छता सप्ताह” आयोजित करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, स्व. अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी दिलेले योगदान आणि त्यांची विकासाभिमुख कार्यपद्धती शहरासाठी सदैव प्रेरणादायी राहिली आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्येही आठवडाभर विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात यावे.
या अभियानांतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागात नाले व गटारांची साफसफाई, ड्रेनेज चोकअप दूर करणे, ओला व सुका कचरा संकलन, राडारोडा उचलणे, डास प्रतिबंधासाठी औषध फवारणी, रस्त्यांची रंगरंगोटी व फ्लुरोसंट पेंट मार्किंग तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध स्वच्छता उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, या संपूर्ण अभियानाची जबाबदारी उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांवर निश्चित करून प्रत्येक प्रभागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, जेणेकरून शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



