विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मान्यवरांचे मार्गदर्शन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
खान्देश मराठा पाटील समाज संघ, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी ‘गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ’ दिनांक १९ जुलै २०२६ रोजी आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात अत्यंत उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला.
पोलिस निरीक्षक (एसीबी, पुणे) गिरीश सोनवणे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान होते. तर चिंचवडचे लोकप्रिय आमदार शंकरशेठ जगताप, कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक प्रदीप बोरसे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक चेतन भुजबळ आणि प्रख्यात जल अभ्यासक भिला पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमेच्या पूजनाने झाल्यानंतर, संस्थेचे संचालक व सल्लागार पंकज निकम यांनी प्रास्ताविकातून समाज संघातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच गुणवंतांचा सन्मान करणे ही परंपरा कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार शंकरशेठ जगताप यांनी शिक्षण, शिस्त, सातत्यपूर्ण परिश्रम आणि ध्येयपूर्तीसाठी लागणाऱ्या जिद्दीचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात गिरीश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर प्रशासकीय सेवेमध्ये आपले करिअर घडवावे, असे आवाहन केले. प्रदीप बोरसे यांनी कामगार कल्याण मंडळाच्या विविध शैक्षणिक योजना व शिष्यवृत्तींची माहिती दिली, तर भिला पाटील यांनी दहावी-बारावीनंतरचे उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि करिअरच्या नव्या वाटा याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
या विशेष सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात घवघवीत यश संपादन करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याकामी सदिच्छा व्यक्त केल्या.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी खान्देश मराठा पाटील समाज संघाचे अध्यक्ष महेंद्र नारायण पाटील, कार्याध्यक्ष शरद पाटील, सचिव शंकर पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सल्लागार व उद्योजक पंकज निकम, संचालक मोतीलाल भामरे, प्रदीप शिरसाठ आणि देविदास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी व ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन शंकर पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कार्याध्यक्ष शरद पाटील यांनी मानले. समाज संघाचे पदाधिकारी, सभासद, पालक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागाने हा गुणगौरव सोहळा अतिशय दिमाखात संपन्न झाला.


