खेड | प्रतिनिधी : युनूस खतीब
खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका महिलेविरुद्ध चाकण दक्षिण पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मौजे साबळेवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथे पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. यावेळी एका घराच्या पडवीत महिला आरोपी गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी काळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममधील द्रव्याची तपासणी केली असता त्यास गावठी दारूचा तीव्र वास येत असल्याचे निदर्शनास आले. तसेच घरातील एका प्लास्टिक गोणीतून गावठी दारूने भरलेले ३३ फुगे जप्त करण्यात आले.
या कारवाईत एकूण २ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई शत्रुघ्न भारत शिंदे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार कोकाटे करीत आहेत.
ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात पोलिसांची मोहीम सुरू असून अशा बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


