spot_img
spot_img
spot_img

रात्री २ वाजता ‘जय भीम’च्या हाकेला धावले कार्यकर्ते; चाकणमधून ७० वर्षीय तमिळ वृद्धाची सुटका

चाकण | प्रतिनिधी : युनूस खतीब

‘जय भीम’ या दोन शब्दांनी सुरू झालेली मानवतेची लढाई अखेर एका ७० वर्षीय तमिळ वृद्धाच्या सुटकेने यशस्वी ठरली. पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकरी कार्यकर्ते प्रमोद क्षीरसागर, राहुल सोनावणे, संदीप माने आणि युवा कार्यकर्ते महेंद्र सरवदे यांनी मध्यरात्री चाकण येथे धाव घेत एका वृद्धाची सुटका केल्याची घटना घडली असून या मानवतावादी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील VCK पक्षाचे वरिष्ठ नेते सर वॉलवन यांनी राहुल सोनावणे यांच्याशी संपर्क साधून चाकण परिसरात ‘राजा’ नावाच्या सुमारे ७० वर्षीय वृद्धाला खोटे आश्वासन देऊन आणण्यात आल्याची माहिती दिली. त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवून जबरदस्तीने मजुरी करून घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून तो मदतीसाठी विनवणी करत असल्याचेही सांगण्यात आले.

ही माहिती मिळताच दिवसभर सामाजिक कार्यात व्यस्त असलेल्या प्रमोद क्षीरसागर, राहुल सोनावणे आणि संदीप माने यांनी कोणताही विलंब न करता चाकणकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत युवा कार्यकर्ते महेंद्र सरवदे हेही सहभागी झाले.

मध्यरात्रीनंतर घटनास्थळी पोहोचल्यानंतर भाषेची मोठी अडचण निर्माण झाली. संबंधित वृद्धाला मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषा अवगत नसल्याने संवाद साधणे कठीण झाले. मात्र मोबाईलवरून ऐकू येणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाचा मागोवा घेत कार्यकर्त्यांनी त्या वृद्धाचा ठावठिकाणा शोधून काढला.

वृद्धाने संबंधित मालकाच्या घराकडे बोट दाखवत आपल्याला तेथे डांबून ठेवल्याचे संकेत दिले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता वातावरण तणावपूर्ण बनले. संबंधित व्यक्तीने अरेरावी करत स्थानिकांना भडकविण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राहुल सोनावणे यांनी तत्काळ आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधला. काही मिनिटांतच चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्त्यांनी पोलिसांना संपूर्ण माहिती दिली. तामिळनाडूमधील VCK नेते सर वॉलवन यांच्याशीही पोलिसांचे दूरध्वनीद्वारे संभाषण करून देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मालकासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेत वृद्धाची सुटका केली.

दरम्यान, परतीच्या प्रवासात राहुल सोनावणे यांनी मोबाईलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्या वृद्धाला दाखवला. बाबासाहेबांचा फोटो पाहताच वृद्धाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्याने दोन्ही हात जोडून अभिवादन केले आणि थरथरत्या आवाजात केवळ दोन शब्द उच्चारले – “जय भीम!”

या प्रसंगाने उपस्थित सर्वजण भावुक झाले. भाषा, प्रदेश आणि संस्कृती वेगळी असली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीचा आदर, स्वाभिमान आणि ‘जय भीम’ची भावना हीच माणसांना जोडणारी खरी भाषा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या धाडसी आणि मानवतावादी कार्याबद्दल प्रमोद क्षीरसागर, राहुल सोनावणे, संदीप माने, महेंद्र सरवदे तसेच चाकण पोलिसांचे विविध सामाजिक संघटना, आंबेडकरी कार्यकर्ते आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!