पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
शिरगाव परिसरात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या दारूबंदी विरोधी पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत २८ लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक ईश्वर राजपूत (वय २५, रा. शिरगाव) हा शिवसाई सोसायटी परिसरातील पत्राशेडच्या आडोशाला शासनाने प्रतिबंधित केलेली गावठी हातभट्टी दारू विक्रीसाठी बाळगून असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दारूबंदी विरोधी पथकाने छापा टाकला असता आरोपीकडून सुमारे २ हजार ८०० रुपयांची २८ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
मानवी आरोग्यास अपायकारक असलेली ही दारू विक्रीसाठी ठेवून आरोपी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि पारखे करीत आहेत.
स्थानिक भागात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असून अशा व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.




Total Users : 226837