पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
सायबर फसवणूक प्रकरणांमध्ये वापरासाठी स्वतःचे बँक खाते उपलब्ध करून देणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या खात्यामार्फत लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम नंदू लोखंडे (वय १९, रा. काळेवाडी फाटा, पुणे) याने स्वतःच्या नावाने जळगाव जनता सहकारी बँकेत खाते उघडून ते संघटित सायबर गुन्हेगारी टोळीच्या वापरासाठी उपलब्ध करून दिले. या खात्यावरून २३ लाख २३ हजार ३४१ रुपयांचे आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
या व्यवहारांच्या माध्यमातून देशातील दोन नागरिकांची २ लाख ६२ हजार ९४८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सायबर गुन्हेगारांना बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जात असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


