पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
चाकण परिसरात बटाट्याच्या भाजीच्या चवीवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत एका कामगाराला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या ओठांना टाके पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उत्तर चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राक्षेवाडी (ता. खेड) येथे १३ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी रामनिवास बिलाश बरई (वय ४५) यांनी जेवणासाठी बनवलेल्या बटाट्याच्या भाजीची चव चांगली नसल्याने दुसरी भाजी देण्याची मागणी केली होती.
यावरून आरोपी शैलेश यादव याच्याशी वाद झाला. त्याने आपल्या भावाला धर्मेंद्र यादव याला फोन करून घटनेची माहिती दिली. भावाने चिथावणी दिल्यानंतर संतापलेल्या आरोपीने फिर्यादीला लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादीच्या तोंडाला व हाताला गंभीर दुखापत झाली. ओठांना टाके पडले असून उजव्या हाताच्या तीन बोटांनाही दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी उत्तर चाकण पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


