spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन – विनोद वरखडे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासी आणि पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवडाभरात रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाहतूक सेल अध्यक्ष श्री. विनोद वरखडे यांनी दिला आहे.

 

यासंदर्भात महापौर, महापालिका आयुक्त आणि विरोधी पक्षनेते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी पावसाळ्यात खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवले जातात. मात्र पावसामुळे भराव वाहून जात असल्याने काही दिवसांतच खड्डे पुन्हा निर्माण होतात. त्यामुळे कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्तीची आवश्यकता आहे.

शहरातील देहू-आळंदी रस्ता, चिंचवड स्टेशन परिसर, तळवडे, मोशी-चऱ्होली रस्ता, बोऱ्हाडेवाडी तसेच चिंचवड स्टेशन ते चिखली या मार्गांवरील रस्त्यांची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. निगडी ते चिंचवडदरम्यान मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ते आधीच अरुंद झाले असून, त्यात खड्ड्यांमुळे वाहतूक संथ होत आहे. परिणामी एसटी, पीएमपीएमएल व इतर सार्वजनिक वाहतूक सेवांवर परिणाम होत असून प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून पादचारी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पुढील आठवडाभरात रस्ते दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. विनोद वरखडे यांनी दिला.

यावेळी पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप औटी, सामाजिक कार्यकर्ते भरतशेठ वाळके, अनुराग कुरणे पाटील, अकबर शेख, स्वप्निल चौव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!