पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
चिंचवडमधील मोरवाडी परिसरात एका १८ वर्षीय तरुणाला घरातून बोलावून नेऊन चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास एच.ए. ग्राउंड, अजमेरा कॉलनीजवळ ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादी युवराज मानकर यांना दुचाकीवरून ग्राउंडवर नेले. तेथे आधीच थांबलेल्या इतर आरोपींसह चौघांनी मिळून त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
यानंतर एका आरोपीने कमरेला लपवून ठेवलेला चॉपर काढून फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार केला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने तोच चॉपर घेऊन उजव्या हातावर वार केल्याने युवराज गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकरणी आदित्य भालेराव, प्रदीप कळसे, गोपाल सूर्यवंशी आणि ओंकार मोगे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे करीत आहेत.


