शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेतून देशभर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले आहे. त्याचा परिणाम लवकरच जाणवू लागेल. मात्र, नव्या पिढीला शिकवताना शिक्षण संस्थांनी आता अत्याधुनिक तंत्रांचा वापर करणे आवश्यक आहे,’ असे सांगून खडकी शिक्षण संस्थेने जुन्या फळ्यांऐवजी इंटरॅक्टिव्ह बोर्डवर शिक्षण देणे सुरू केले आहे, ही मोठ्या बदलाची नांदी आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय नागरी व विमान वाहतूक, तसेच सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी काढले.
खडकी शिक्षण संस्थेच्या वैदेही दत्ताजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शनिवारी मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल होते. संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, प्रसिद्ध उद्योजक दत्ताजी गायकवाड, वैदेही गायकवाड, उपमहापौर परशुराम वाडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहता, चिटणीस आनंद छाजेड, सहचिटणीस सुरजभान आगरवाल, खडकी कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत, नगरसेवक सुनील पांडे, नगरसेविका सपना छाजेड आदी याप्रसंगी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ‘देशभरात पुणे ही शिक्षणाची पंढरी मानले जाते. इथे ज्ञानासह क्रीडा, संस्कृती जपण्याचे कामही मोठ्या प्रमाणात होते. साहजिकच इथे मोठी विद्यापीठे व महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यात खडकी शिक्षण संस्थेने मोलाचे योगदान दिले आहे. संस्थेच्या ११३ वर्षांच्या इतिहासात माजी विद्यार्थ्यांमधूनच समाजासाठी मोठे कार्य करणारी व्यक्तिमत्वे निर्माण झाली. त्यांनीच मातृसंस्थेला बळकटी देण्याचे काम केले आहे.’
उपमहापौर परशुराम वाडेकर, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले, तर ॲड. अजय सूर्यवंशी यांनी आभार मानले. कृष्णकुमार गोयल, अनिल मेहता, सुरजभान आगरवाल, राजेंद्र भुतडा, सविता नायर यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून, समाज घडविण्याची शक्ती आहे. या विचारानेच प्रेरित होऊन खडकी शिक्षण संस्था गेली ११३ वर्षे अखंडितपणे कार्य करीत आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानासह कला व क्रीडा गुणांच्या विकासासाठी सातत्याने वाव दिला जातो. ही शिक्षण संस्था म्हणजे केवळ भिंती किंवा इमारत नसून, एक जिवंत परंपरा आहे, जी पिढ्यान्पिढ्यांचा ज्ञानदानाचा वारसा अविरतपणे पुढे नेत आहे.
– कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष, खडकी शिक्षण संस्था


