spot_img
spot_img
spot_img

सांगवी वाहतूक विभागातील पोलिसांना रिफ्लेक्टरयुक्त रेनकोटचे वाटप

पावसात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी उन्नती सोशल फाउंडेशनचा उपक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पावसात नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या सुरक्षिततेची जबाबदारी समाजानेही उचलली पाहिजे, या भावनेतून उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने सांगवी वाहतूक विभागातील पोलिसांना रिफ्लेक्टरयुक्त रेनकोटचे वाटप करण्यात आले.

पावसाळ्यात मुसळधार पाऊस, कमी दृश्यमानता आणि प्रतिकूल परिस्थितीत वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांचे काम अधिक आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत त्यांना संरक्षण मिळावे तसेच रिफ्लेक्टरयुक्त रेनकोटमुळे रात्रीच्या वेळी त्यांची दृश्यमानता वाढून सुरक्षितता अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमामागील संकल्पना विशद करताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “वाहतूक पोलीस कोणत्याही हवामानाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यांच्या सेवेला कृतज्ञतेची सलामी म्हणून हा छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवा आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याचा आम्हा सर्वांचा छोटासा प्रयत्न आहे. समाजासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आपणही संवेदनशील राहिले पाहिजे. या उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल सांगवी वाहतूक विभागाचे मनःपूर्वक आभार. समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या सुरक्षिततेसाठी उन्नती सोशल फाउंडेशन भविष्यातही अशाच लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करत राहील.”

उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करताना सांगवी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे म्हणाले, “उन्नती सोशल फाउंडेशन समाजहितासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून पोलिसांप्रतीही त्यांनी नेहमीच संवेदनशील भूमिका घेतली आहे. यापूर्वी वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी फाउंडेशनने आम्हाला बॅरिकेट्स उपलब्ध करून दिले होते, तर आता पावसाळ्यात वाहतूक पोलिसांच्या सुरक्षिततेचा विचार करून रिफ्लेक्टरयुक्त रेनकोटचे वाटप केले आहे. पाऊस, वाहतुकीची गर्दी आणि कमी दृश्यमानता अशा आव्हानात्मक परिस्थितीत रस्त्यावर कर्तव्य बजावताना या रेनकोटचा आम्हाला निश्चितच मोठा उपयोग होणार आहे. पोलिसांच्या कार्याचा सन्मान करत त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे, संस्थापक श्री. संजय भिसे तसेच फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल सांगवी वाहतूक विभागाच्या वतीने मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.”

या प्रसंगी सांगवी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, पोलीस उपनिरीक्षक दगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालव, पोलीस हवालदार मुंडे, पोलीस शिपाई साबळे तसेच महिला पोलीस शिपाई गुजर उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे, संस्थापक श्री. संजय भिसे यांच्यासह फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!