पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी / युनूस खतीब
चिंचवडमधील मोहननगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “काय बघतोस?” या कारणावरून दोन युवकांनी एका तरुणावर चाकूने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकाचा सहभाग समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ८ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडसमोर, सेंट अँड्र्यूज स्कूलजवळ, मोहननगर येथे घडली. फिर्यादी शंकर कृष्णा कापल, त्यांचा मित्र अजय घनश्याम सखा आणि कृष्णा वृंदावन बिशोई हे तिघे मित्र एकत्र जात असताना रस्त्यावर थांबले होते.
त्यावेळी परिसरातील एका विधीसंघर्षित बालकाने अजय सखा याला उद्देशून शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या आदित्य गायकवाड (वय १९, रा. काळभोरनगर, चिंचवड) याला चिथावणी देत “दम असेल तर चाकू काढून याला खल्लास कर” असे सांगितल्याचा आरोप आहे.
यानंतर आदित्य गायकवाड याने कमरेला लपवून ठेवलेला चाकू काढून अजय सखा याच्यावर जीवघेणा हल्ला केला. अजयच्या पाठीत चाकू भोसकून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादी शंकर कापल याचाही पाठलाग करून त्याला धमकावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ३५२, ४९, ३(५) तसेच भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी आदित्य गायकवाड याला अटक केली असून विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे मोहननगर परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणांवरून वाढत चाललेल्या चाकूहल्ल्यांच्या घटनांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.



