पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी / युनूस खतीब
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेत तीन वर्षांच्या चिमुकलीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट चोरणाऱ्या दोघांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे पालखी सोहळ्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी सकाळी सुमारे ११.५० वाजता दत्तनगर बस स्टॉप, दिघी येथे ही घटना घडली. फिर्यादी मयूर श्रावण चिमटे (वय २८) हे आपल्या कुटुंबासह संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शनासाठी मोठी गर्दी असताना आरोपींनी संधी साधत त्यांच्या अंतरा (वय ३ वर्षे) या मुलीच्या गळ्यातील सोन्याचे ओम आकाराचे लॉकेट झडप घालून चोरले.
चोरी झालेल्या लॉकेटची किंमत सुमारे १५ हजार रुपये असून त्याचे वजन अंदाजे एक ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी रघुनाथ बाबुराव दुकळे (वय ४२, रा. हडपसर, पुणे) आणि रावसाहेब साहेबराव जाधव (वय ५५, रा. भूम, धाराशिव) यांना अटक केली आहे. दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालखी सोहळ्यात लाखो वारकरी आणि भाविक सहभागी होत असल्याने गर्दीचा गैरफायदा घेऊन झडपमारी आणि चोरीच्या घटना घडत आहेत. अशा प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुसळे करीत आहेत.




Total Users : 226874