पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या गर्दीचा फायदा घेत भाविक महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखा युनिट-३ ने रंगेहात पकडत उल्लेखनीय कामगिरी केली. आरोपींकडून सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखा युनिट-३ ची विशेष पथके साध्या वेशात तैनात करण्यात आली होती. पालखी आळंदीहून बोपखेल फाट्याकडे जात असताना एका महिला भाविकाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दोन महिलांनी चोरीचा प्रयत्न केला.
मात्र, गर्दीत गुप्तपणे तैनात असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने प्रसंगावधान राखत दोन्ही संशयितांना तत्काळ पकडले. तिच्यासोबत एका विधीसंघर्षित मुलीचाही सहभाग आढळून आला.
याप्रकरणी फिर्यादी सुनिता नारायणराव राऊत (वय ५०) यांच्या तक्रारीवरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१९/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे तसेच सुरेखा बोरसे, बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, दिलीप राठोड, निखील फापाळे आणि स्वप्नील महाले यांच्या पथकाने केली.
पालखीतील गर्दीत चोरी करणाऱ्यांवर गुन्हे शाखेची करडी नजर असल्याचे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.



