शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरातील पूरपरिस्थिती हाताळण्यावरून काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांवर तीव्र टीका केली आहे. पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी आयुक्त दैनंदिन प्रशासकीय कामात व्यस्त असल्याचा आरोप करत “नागरिक त्रस्त, आयुक्त मस्त” अशा शब्दांत त्यांनी निषेध व्यक्त केला.
बनसोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाटनगर, रिव्हर रोड, आंबेडकर कॉलनी, रमाबाई नगर आणि पुनर्वसन इमारतीलगतच्या परिसरात मुसळधार पावसामुळे सहा फूटांपर्यंत पाणी साचले होते. पूर ओसरल्यानंतर घरांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नागरिकांना स्वच्छतेसह रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.
घरातील कपडे, अन्नधान्य, फर्निचर आणि इतर साहित्य पाण्यामुळे खराब झाले असून नागरिकांनी ते रस्त्यावर काढून ठेवले आहे. परिसराची स्वच्छता करण्यासाठी तसेच घरांमधील गाळ काढण्यासाठी पाण्याची गरज असतानाही महापालिकेकडून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काही नागरिकांसह आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, ते प्रशासकीय बैठकींमध्ये व्यस्त असल्याने भेटीसाठी वेळ दिला नसल्याचा दावाही बनसोडे यांनी केला. आपत्कालीन परिस्थितीत आयुक्तांनी कार्यालयात न बसता शहरातील पूरग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे अपेक्षित होते, असे त्यांनी म्हटले आहे.
पूरग्रस्त नागरिकांच्या अडचणी तातडीने दूर करून स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्यविषयक उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.


