शबनम न्यूज | प्रतिनिधी
रहाटणी चौक येथील लक्ष्मी भक्ती सोसायटी तसेच रहाटणी गावठाण परिसरात पुराचे पाणी शिरल्याने गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक सागर कोकणे यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले.
सागर कोकणे यांच्या पाठपुराव्यानंतर महावितरणने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. परिणामी परिसरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून उर्वरित ठिकाणीही वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

या कामादरम्यान महावितरणचे अधिकारी सुनील कदम आणि महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून आवश्यक तांत्रिक कामकाज करत होते.
पूरामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन आणि महावितरण यांच्याशी सातत्याने समन्वय साधला जात असल्याचे सागर कोकणे यांनी सांगितले. तसेच नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा पूर्ववत मिळाव्यात, यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


