spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात भीषण दुर्घटना; कचऱ्याचा ढिगारा कोसळून कामगार अडकल्याची भीती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड : मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवडमधील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात मोठी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा प्रकल्पाच्या इमारतीवर कोसळल्याने २ ते ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आणखी ८ ते १० कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस आणि इतर बचाव यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जेसीबीसह आवश्यक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे.

या दुर्घटनेत काही कामगार जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, मृतांचा आणि जखमींचा अधिकृत आकडा प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे नेमके किती जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत आणि दुर्घटनेचे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी दाखल झाले असून संपूर्ण परिसर सुरक्षा कारणास्तव बंद करण्यात आला आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!