spot_img
spot_img
spot_img
spot_img

अतिवृष्टीनंतर प्रभाग १३ मध्ये सचिन चिखले यांची पाहणी; प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

निगडी, यमुनानगर, सेक्टर २२ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील पाणी साचलेल्या भागांची प्रत्यक्ष पाहणी; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक १३ मधील निगडी, यमुनानगर, सेक्टर २२ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी माजी नगरसेविका अश्विनी सचिन चिखले मराठे यांच्यासह संबंधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

पाहणीदरम्यान संबंधित महापालिका अधिकारी आणि प्रशासनाला तात्काळ घटनास्थळी बोलावून पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पावसामुळे पडलेल्या झाडांची तातडीने विल्हेवाट लावण्यात आली. पुढील ४८ तास परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती सचिन चिखले यांनी दिली.

यावेळी सचिन चिखले यांनी नागरिकांना सावधगिरीचे आवाहन करताना सांगितले की, शहरात अजूनही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अनावश्यक प्रवास टाळावा, सखल भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

कालच्या मदत आणि बचाव कार्यात स्थानिक नागरिक, मित्रपरिवार तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संकटाच्या काळात सर्वांनी एकजुटीने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल सचिन चिखले यांनी सर्वांचे आभार मानले.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था मजबूत करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!