शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या (SSC/HSC, CBSE, ICSE) गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दिशा देण्याच्या उद्देशाने, भाजप पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री.शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या वतीने आयोजित “गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि क्रिटिकल डिसिजन मेकिंग सेमिनार २०२६” अत्यंत उत्साहात संपन्न झाला. हॉटेल गोविंद गार्डन ‘बासुरी बँकविट हॉल’ येथे रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता हा दिमाखदार सोहळा पार पडला.
या शिबिराचे मुख्य आकर्षण असलेले देशपातळीवरील प्रसिद्ध ‘बाकलीवाल ट्युटॉरियल्स’चे संचालक व आयआयटी मुंबईचे (B. Tech. IIT Bombay) माजी विद्यार्थी श्री. वैभव बाकलीवाल यांनी उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना ‘करिअर निवडीबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय’ (Critical Decision-Making) कसे घ्यावेत, यावर अत्यंत मोलाचे व प्रभावी मार्गदर्शन केले. १० वी व १२ वी नंतर उपलब्ध असणाऱ्या विविध विद्याशाखा आणि राष्ट्रीय पातळीवरील संधी याबद्दल त्यांनी सखोल माहिती दिली.
पहिल्या ३ टॉपर्सना सायकल व करंडक, तर प्रत्येक विद्यार्थ्याला अनोखी भेट:
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बोर्डातील (SSC, CBSE, ICSE) पहिल्या ३ प्रथम क्रमांकाच्या गुणवंत टॉपर्सना प्रोत्साहन म्हणून सायकल, भव्य ट्रॉफी (करंडक), सॅक (Guddy Bag), वह्या, पेन आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक वाटचालीस मदत म्हणून सॅक, नोटबुक, पेन आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणे हेच आमचे कर्तव्य – शत्रुघ्न काटे
याप्रसंगी बोलताना भाजप शहराध्यक्ष श्री.शत्रुघ्न काटे म्हणाले, “पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील मुलांनी यंदाच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून आपल्या भागाचे नाव उज्ज्वल केले आहे. या विद्यार्थ्यांच्या कष्टाचे कौतुक करणे आणि त्यांना पुढील प्रवासासाठी योग्य दिशा देणे हे आमचे कर्तव्य आहे. वैभव बाकलीवाल सरांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्यास नक्कीच मदत होईल.”
याप्रसंगी नगरसेविका कुंदाताई भिसे,नगरसेविका सौ.अनिताताई काटे,पवना सह. बँक संचालक जयनाथशेठ काटे, भानुदास काटे पाटील, पोपटतात्या काटे, बाळासाहेब काटे, प्रकाश तात्या झिंजूर्डे, स्वप्नाताई शत्रुघ्न काटे, कैलासशेठ कुंजीर संजयशेठ भिसे,संदिपशेठ काटे, मनोज ब्राम्हणकर, राजेश पाटील, सुप्रियाताई पाटील, प्रविण कुंजीर, बाळकृष्ण परघळे, शितल पटेल, समीर देवरे, दिपक गांगुर्डे यांच्यासह शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन कार्यकर्ते, पालक आणि शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी आणि विजय पाटील यांनी केले.


