पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : युनूस खतीब
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने दुचाकी चालवल्यामुळे झालेल्या अपघातात १७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मोशी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील संभाजी महाराज पुतळ्यासमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. सरंजली प्रकाश कराळे (वय १७, रा. कुंभारगाव, ता. पाटण, जि. सातारा) ही आरोपी यश बाळासाहेब निकम (वय २१) आणि त्यांची मैत्रीण प्रज्ञा यांच्यासोबत बजाज पल्सर दुचाकीवर प्रवास करत होती.
दरम्यान, भरधाव वेगामुळे चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून तिघेही रस्त्यावर पडले. अपघातात सरंजली हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
तपासात आरोपी चालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात दुचाकी चालविल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.




Total Users : 226883