पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : युनूस खतीब
चाकण परिसरात किराणा दुकानाच्या थकित पैशांच्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून उत्तर चाकण पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बकरी बाजार, रोहकल रोड, चाकण येथील ग्रीन इस्टेट परिसरात ही घटना घडली. फिर्यादी शिवकुमार दिनेश महतो (वय १९) हा आपल्या खोलीबाहेर बूट काढत असताना त्याचा मित्र नरेश कुमार रामप्रकाश महतो (वय १८) याच्याशी वाद झाला.
आरोपीने किराणा दुकानातून सामान घेतल्यानंतर दुकानदाराला मोबाईलद्वारे पैसे पाठवले नसल्याबाबत फिर्यादीने विचारणा केली. याच कारणावरून आरोपी संतापला. वाद वाढल्यानंतर आरोपीने हातातील भाजी कापण्याच्या चाकूने फिर्यादीच्या डाव्या हातावर आणि पोटावर वार केले.
या हल्ल्यात शिवकुमार महतो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उत्तर चाकण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) व ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार ढवळे करीत आहेत.


