पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : युनूस खतीब
नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून एका माजी कर्मचाऱ्याने व्यावसायिकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना भोसरी एमआयडीसी परिसरात घडली. या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास स्पाईन मॉल चौकासमोरील रस्त्यावर ही घटना घडली. राहुल कुमार श्रीअकलू दास (वय २८) हे मित्राला भेटण्यासाठी स्पाईन मॉल परिसरात आले होते. यावेळी ते मोबाईलवर कुटुंबीयांशी बोलत असताना त्यांच्याकडे पूर्वी काम करणारा महेश दीपक सांगळे (वय २६) आला.
महेश सांगळे याने फिर्यादीशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादीने बोलण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला. नोकरीवरून काढल्याचा राग मनात धरून आरोपीने धारदार शस्त्राने फिर्यादीच्या डोक्याच्या डाव्या बाजूस, कानाजवळ आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात राहुल दास यांच्या डोक्यातून व शरीरातून रक्तस्त्राव होऊन ते जखमी झाले.
घटनेनंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी महेश सांगळे याला अटक केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोरटे करीत आहेत.




Total Users : 226889