पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : युनूस खतीब
क्षुल्लक वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चऱ्होली खुर्द परिसरात घडली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घोलप वस्ती, काकडे सिटी, चऱ्होली खुर्द येथे ही घटना घडली. साहिल रामदास दाभाडे (वय २९) याने किरकोळ वादाच्या रागातून करवीरसिंग नाथूसिंग लोढी (मूळ रा. दमोह, मध्य प्रदेश) याच्या डोक्यात हातोड्याने वार केले. गंभीर दुखापत झाल्याने करवीरसिंग याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी साहिल दाभाडे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे चऱ्होली परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत.




Total Users : 226891