पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
आंबेठाण परिसरात सहजीवनात राहणाऱ्या महिलेवर चाकूने जीवघेणा हल्ला करून तिच्या मुलीला घेऊन गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी चांगदेव नागनाथ मुंडे (वय ३०, रा. मेंढवाडी, ता. धारूर, जि. बीड) हे गेल्या दोन वर्षांपासून सहजीवनात राहत होते. त्यांना स्वरा नावाची मुलगी आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी दारूच्या नशेत महिलेला मारहाण करत असल्याने ती त्याच्यापासून वेगळी राहत होती.
दरम्यान, १ जुलै रोजी आरोपीने महिलेकडे येत दोघे एकत्र राहत नसल्याच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर चाकूने तिच्या डाव्या छातीवर वार करून गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपीने स्वरा या मुलीला सोबत घेऊन पलायन केले.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


