पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
काळेवाडी परिसरात घराच्या वाटणीच्या वादातून झालेल्या संतापजनक घटनेत एका व्यक्तीचा लोखंडी रॉडने मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि. १ जुलै) उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या काकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा गार्डन सोसायटी, जीवन चौक, काळेवाडी येथील सी-विंगमधील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. घराच्या वाटणीचा वाद, नोकरीच्या कारणावरून निर्माण झालेला राग तसेच कुटुंबीय आपल्याला सोडून गेल्याचा संशय या कारणांमुळे आरोपी संजय उमाजी पाखरे (वय ६२) यांनी त्यांचा पुतण्या गणेश राजेंद्र पाखरे (वय ३२) याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी गणेशचा भाऊ रोशन ऊर्फ मयूर राजेंद्र पाखरे (वय २९) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास काळेवाडी पोलिसांकडून सुरू आहे.




Total Users : 227407