पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
भांबोली गाव परिसरात अवैधरित्या देशी दारूचा साठा विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका युवकाला उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. विश्वजित बिपिनकुमार महिलांगे (वय 19, रा. भांबोली, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास भांबोली गाव हद्दीतील दोस्ती चायनीज हॉटेलच्या उजव्या बाजूच्या मोकळ्या जागेत छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपीकडून 180 मिलीच्या 51 बाटल्या आणि 90 मिलीच्या 37 बाटल्या अशा एकूण 88 बाटल्या देशी दारू जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 5 हजार 560 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर दारू परवान्याविना विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या साठवून ठेवण्यात आली होती. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.


