पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
बावधन परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेला बावधन पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून १७ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 29) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रायन स्कूलसमोरील जाधववस्ती परिसरात नाना मोकाशे यांच्या दुकानाजवळ ही कारवाई करण्यात आली. बावधन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अरुण पांडुरंग नारळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित महिलेची झडती घेण्यात आली.
या झडतीदरम्यान आरोपी महिलेच्या ताब्यातून विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या ठेवलेला 340 ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 17 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थोरबोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


