पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
इंदोरी (ता. मावळ) येथे मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश शंकर शिंदे (वय 31, रा. ठाकरवस्ती, इंदोरी) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. 28) रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर ही घटना घडली. शेजारी राहणारा आरोपी दीपक गायकवाड याने गाणी मोठ्या आवाजात लावल्याच्या कारणावरून फिर्यादीशी वाद घालत लाकडी दांडक्याने डाव्या हातावर, डोक्यावर, डाव्या कानावर व मानेवर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या कानातून रक्तस्त्राव झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नी रिकी शिंदे यांनाही आरोपीच्या पत्नीने शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 118, 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.



