पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
भोसरी एमआयडीसी परिसरात पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून शस्त्र बाळगण्यास मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास क्रांती चौक ते प्रधानमंत्री आवास योजनेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शिर्के कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्पजवळ संशयित हालचाली आढळून आल्याने तपासणी करण्यात आली. यावेळी एका विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा सुमारे ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घातक शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही संबंधित बालकाकडे हे शस्त्र आढळून आल्याने भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), ३७(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित विधीसंघर्षित बालकास नोटीस देण्यात आली असून पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.




Total Users : 227420