पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जुनी सांगवी येथील दत्त आश्रम मठासमोरील मोकळ्या जागेत गणेश बालकृष्ण पडाची (वय ३६, रा. लक्ष्मीनगर लेन क्र. ४, पिंपळे गुरव) हा संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी कोयता आढळून आला.
पिंपरी-चिंचवड पोलीस सहआयुक्तांनी २४ जून ते ७ जुलै या कालावधीत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई करणारे आदेश लागू केलेले असताना आरोपीने त्याचे उल्लंघन केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), ३७(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.


