पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
फॉरेक्स ट्रेडिंगमधून अल्पावधीत ३५ ते ४० टक्क्यांहून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत बावधन येथील एका उद्योजकाची तब्बल ८८ लाख १९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत कुलकर्णी (वय ४८, रा. बावधन) यांच्याशी स्वतःला गुंतवणूक सल्लागार म्हणून ओळख करून देणाऱ्या दिव्या अग्रवाल शर्मा या महिलेने संपर्क साधला. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपींनी त्यांना एका संकेतस्थळावर खाते उघडण्यास सांगितले. तसेच टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याच्या सूचना दिल्या.
सुरुवातीला गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळणार असल्याचे दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, नंतर गुंतवलेली रक्कम काढण्यासाठी टॅक्स, प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्कांच्या नावाखाली वारंवार पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. अशाप्रकारे आरोपींनी फिर्यादीकडून ८८.१९ लाख रुपये उकळून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी संबंधित संकेतस्थळ धारक, टेलिग्राम आयडी, मोबाईल क्रमांक वापरकर्ते तसेच विविध बँक खातेदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.
सायबर पोलिसांचे आवाहन : सोशल मीडियावर किंवा टेलिग्रामद्वारे मिळणाऱ्या ‘हमीशीर नफा’, ‘जलद परतावा’ किंवा ‘फॉरेक्स ट्रेडिंग’च्या आकर्षक ऑफर्सवर विश्वास ठेवू नये. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्थेची वैधता तपासूनच व्यवहार करावेत.


