पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्रांविरोधात सुरू असलेल्या विशेष ‘आर्म ड्राईव्ह’ मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट-२ ने मोठी कारवाई करत दोन सराईत आरोपींकडून तीन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे अवैध शस्त्र तस्करी आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक माहिती संकलन करत असताना पोलीस शिपाई रवी पवार यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार बावधन येथील चांदणी चौक परिसरात अवैध शस्त्रांसह येणार आहेत.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून आर्यन प्रकाश जाधव (वय २०, रा. बावधन) आणि ओमकार सचिन मोरे (वय २३, रा. कोथरूड) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये तीन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ शस्त्रसाठा जप्त करून दोघांविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमकार मोरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही आर्म्स अॅक्ट, अपहरण, मारहाण, दंगल आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६६/२०२६ अन्वये आर्म्स अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-२ करत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली व सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
जप्त मुद्देमाल
- ३ अवैध पिस्तुले
- २ जिवंत काडतुसे
- २ सराईत आरोपी ताब्यात
- आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-२ कडून सुरू


