spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र टीईटी परीक्षा स्थगित; पेपरफुटीच्या संशयामुळे परीक्षेच्या 24 तास आधी मोठा निर्णय

युनूस खतीब | पिंपरी-चिंचवड

महाराष्ट्रात शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवार, 28 जून रोजी होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी-2025) परीक्षेच्या अवघ्या 24 तास आधी स्थगित करण्यात आली आहे. पेपरफुटीच्या संशयावरून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या छापेमारीदरम्यान काही संशयास्पद प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्या. प्राथमिक तपासात या प्रश्नपत्रिकांमधील काही प्रश्न टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तातडीने सतर्क झाली.

सध्या जप्त करण्यात आलेले दस्तावेज हे खरे टीईटी प्रश्नपत्र आहेत की केवळ सरावासाठीचे (मॉक टेस्ट) प्रश्नपत्र आहेत, याची सखोल चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत परीक्षा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांच्या तयारीवर परिणाम झाला असून परीक्षेची नवीन तारीख कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू असून पेपरफुटी झाली का, याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, परीक्षा स्थगित झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!