पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
चिखली परिसरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित सुपारीचा मोठा अवैध साठा ठेवणाऱ्या अड्ड्यावर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 26 लाख 93 हजार 546 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जून 2026 रोजी बग वस्ती, कानिफनाथ मंदिराजवळील पत्र्याच्या शेडमधील तीन खोल्यांवर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट सुपारी व तत्सम पदार्थांचा मोठा साठा विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला.
या प्रकरणी गणेश बाळू बग याला अटक करण्यात आली असून देवाराम देवासी, राणाप्रताप सिंह, रुस्तम खान, बाबर खान आणि गौस मोहिद्दीन कमालशा उर्फ बाबाभाई यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून विक्रीसाठी ठेवला असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोमारे करीत आहेत.




Total Users : 227436