spot_img
spot_img
spot_img

बनावट सरकारी आदेशाच्या आधारे कोट्यवधींच्या जमिनीचे व्यवहार; सहाजणांविरुद्ध गुन्हा

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

मावळ तालुक्यातील मोरवे येथील मौल्यवान जमिनीच्या व्यवहारासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची बनावट प्रत तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे मोरवे (ता. मावळ) येथील गट क्रमांक ३६१ मधील सुमारे ९ हेक्टर ५४ आर क्षेत्राची जमीन भोगवटादार वर्ग-२मध्ये मोडते. ही जमीन हस्तांतरित करण्यासाठी आरोपींनी मावळ-मुळशी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेशाची प्रत तयार केली. त्यानंतर त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे सातबारा उघडून जमीन खरेदी-विक्रीचे दस्त नोंदविण्यात आले.

या प्रकरणात मनीष वाकडे, विनोद डफळ, समिर काढगे, प्रियदर्शनी शिंदे, समिर लोहकरे आणि स्मिता लोहकरे या सहा जणांनी संगनमताने बनावट दस्तऐवजांचा वापर करून जमीन व्यवहार केल्याचा आरोप आहे. या व्यवहारातून शासनाची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीच्या व्यवहारात बनावट शासकीय आदेश वापरल्याने महसूल विभागात खळबळ उडाली असून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची चौकशी पोलीस करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक खामगळ करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!