spot_img
spot_img
spot_img

तळेगाव एमआयडीसी परिसरात एक किलो गांजासह मजूर अटकेत

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मावळ तालुक्यातील बधलवाडी परिसरात कारवाई करत तब्बल एक किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका मजुराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नवलाख उंबरे ते बधलवाडी रोडवरील मुक्ताई मंदिराजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत दत्ता सोपान बधाले (वय ५८, रा. बधलवाडी, ता. मावळ) याला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्या ताब्यात १००७ ग्रॅम वजनाचा गांजा, तसेच रोख रक्कम आढळून आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५१ हजार १५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक चौकशीत आरोपीने गांजा कोणाकडून आणला याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!