पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
हिंजवडी पोलिसांनी मारुंजी परिसरात कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी सायंकाळी पर्पल प्राईड सोसायटीसमोर, शिंदेवस्ती ते जगताप चौक सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणाची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत विक्रांत विकास येवले (वय २२, रा. पाचाणे, ता. मावळ) याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांची किंमत सुमारे ५१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत शस्त्रबंदीचे आदेश लागू असताना आरोपीने बेकायदेशीररीत्या पिस्तूल आणि काडतुसे बाळगून आदेशाचे उल्लंघन केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे शस्त्र कुठून आले आणि त्याचा वापर कोणत्या उद्देशाने केला जाणार होता, याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ करीत आहेत.


