spot_img
spot_img
spot_img

देहू-आळंदी परिसराला ‘पंचक्रोशी संतभूमी’चा दर्जा द्या; वारकरी संप्रदायाची राज्य शासनाकडे जोरदार मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या देहू-आळंदी परिसराला ‘पंचक्रोशी संतभूमी’ म्हणून अधिकृत मान्यता देऊन विशेष संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाने शासनाला सविस्तर निवेदन सादर केले आहे.

वारकरी संप्रदायाची प्रमुख श्रद्धास्थाने असलेल्या देहू आणि आळंदी या दोन्ही तीर्थक्षेत्रांमधील सुमारे १६ किलोमीटरचा परिसर इंद्रायणी नदीच्या उभय तीरावर वसलेला असून, हा संपूर्ण पट्टा संत परंपरेच्या समृद्ध वारशाने नटलेला आहे. त्यामुळे या परिसराला ‘पंचक्रोशी संतभूमी’ म्हणून घोषित करून त्याचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी स्वतंत्र धोरण आखावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हा परिसर केवळ संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापुरता मर्यादित नसून, संत नामदेव, नाथ संप्रदायातील सिद्धपुरुष तसेच वारकरी परंपरेतील अनेक संतांच्या कार्याशी आणि स्मृतींशी निगडित आहे. या भागात असलेल्या प्राचीन मंदिरे, समाधीस्थळे, शिवपिंडी, तसेच संतांच्या जीवनाशी संबंधित ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

वारकरी प्रतिनिधींनी सांगितले की, उत्तराखंड राज्याने धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विशेष धोरण राबविल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही देहू-आळंदी परिसरासाठी स्वतंत्र संवर्धन आराखडा तयार करावा. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि पर्यावरणीय बदलांमुळे या पवित्र भूमीचे आध्यात्मिक व सांस्कृतिक अस्तित्व धोक्यात येत असल्याने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘पंचक्रोशी संतभूमी’चा दर्जा मिळाल्यास या परिसरातील सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि पर्यटनविषयक उपक्रमांना मोठी चालना मिळेल. तसेच संत परंपरेचा अमूल्य वारसा पुढील पिढ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविणे शक्य होईल, असा विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला.

या मागणीसाठी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, माजी महापौर रवी लांडगे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर हेही प्रयत्नशील असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे आणि संचालिका डॉ. स्वाती संजय मुळे यांनी शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून देहू-आळंदी परिसराला लवकरात लवकर ‘पंचक्रोशी संतभूमी’चा अधिकृत दर्जा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!